येऊदे सय सयी तुझी – YEOODE SAY SAYEE TUZEE


ग्रीष्म बहरता कात टाकुनी, येऊदे सय सयी तुझी
हृदयाला गदगदा हलवुनी,  येऊदे सय सयी तुझी

सय आल्यावर भय थरथरते, गारांसम ते कोसळते
ओंजळीत हिम शुभ्र झेलुनी,  येऊदे सय सयी तुझी

निश्चल काया नयनी वादळ, अधर तरीपण मुके मुके
मस्त मोकळे धुंद बरसुनी,  येऊदे सय सयी तुझी

येच तारके पृथ्वीवरती, बनून अशनी वा उल्का
त्या शिलांचे शिल्प घडवुनी,  येऊदे सय सयी तुझी

उधळित पाचू हिरे माणके, पुष्कराज अन मोत्यांना
अवघ्या देही वीज माळुनी,  येऊदे सय सयी तुझी

निशानाथ नव पूर्ण बघाया, चाखायाला मधुर फळे
कटू स्मृतींसह अहं त्यागुनी, येऊदे सय सयी तुझी

धवल धार अन सुवर्ण किरणे, भेदित जाता परस्परा
इंद्रधनूचे रंग माखुनी,  येऊदे सय सयी तुझी

दिशादिशातुन जयघोषाची, उठेल जेव्हा ललकारी
घोड्यावरती स्वार होउनी,  येऊदे सय सयी तुझी

आभाळाचा घुमट तापता, उकड काहिली जीवांची
शीत सुगंधित मारुत बनुनी, येऊदे सय सयी तुझी

आठवणीतिल प्रधान प्रियतम, गौण शेष त्या सजावटी
शब्द अर्थ अन भाव घुसळुनी,  येऊदे सय सयी तुझी

जीर्ण छताची काष्ठे जाळुन, राख तयांची मी केली
त्या भस्मातिल ठिणगी बनुनी  येऊदे सय सयी तुझी

आंबट चिंबट गोष्टीतुनही, अर्थ पिसूनी काढ खरा
त्या अर्थाचा कोळ काढुनी,  येऊदे सय सयी तुझी

रंगविले घर शेजही सजली, देवघरातिल देव कुठे?
त्या देवांचा माग काढुनी,  येऊदे सय सयी तुझी

भिजली गात्रे भरे हुडहुडी, जरी तापली रात्र पुन्हा
प्रभात समयी वस्त्रे पिळुनी,  येऊदे सय सयी तुझी

जिना उतरुनी विहिरीमधला, अभिषेकाला जल आणू
अष्टद्रव्ययुत भाव अर्पुनी,  येऊदे सय सयी तुझी

जयकाराने जिनदेवांच्या, लाट समुद्री उसळूदे
भरतीसंगे  गाजगाजुनी,  येऊदे सय सयी तुझी

योगांमधुनी लिहू भावना, कल्याणाची लोकांच्या
दंतकथांतिल फुले माळुनी,  येऊदे सय सयी तुझी

ज्येष्ठामधल्या नक्षत्रांची, माळ शोभता नभांगणी
श्यामल सुंदर कंठामधुनी,  येऊदे सय सयी तुझी

गझल प्रिय सखी तुझी ‘सुनेत्रा’, रम्य सयीतच सदा रमे
तिला भेटण्या पंख पसरुनी,  येऊदे सय सयी तुझी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.