लिही आता बरे काही स्वतःसाठी दुजासाठी
लिही थोडे उकलणारे नको मारू फुका गाठी
कशाला हा हवा गुंता शिरी लागे गझल भुंगा
पुरे झाले अरे भुंग्या नको लागू सदा पाठी
कशासाठी गुरे येती कषायांची निवाऱ्याला
असे वाटे तयांपाठी उगारावी कलम काठी
पुरे आता छुप्या गोष्टी उताराचे वयच खोटे
जवळ येई हळू साठी म्हणोनीरे बुद्धी नाठी
खरे खोटे किती शेरे रिझवणारे भुलवणारे
रदीफांची करी माझ्या तयांसाठी नवी लाठी
वृत्त – वियदगंगा, मात्रा २८
लगावली – ल गा गा गा/ल गा गा गा/ल गा गा गा/ल गा गा गा/