अता प्रभाती फुलापरी मी पहाट स्वप्नामधे दिसावे
असेच सुंदर स्वरूप माझे सतेज हृदयी तुझ्या फुलावे
वनहरिणी मी किरण शलाका उधाणलेली कधी जलौघा
निळे सरोवर प्रशांत सागर विलीन होण्या मला खुणावे
धरेवरी या पिकोत मोती उदंड मुबलक फुले फुलावी
सुजाण शासक असा असावा असी मसी अन कृषी फळावे
अचौर्य पालन व्रतास धरण्या कुणी न चोऱ्या इथे कराव्या
क्षमा नि मार्दव धरूत आर्जव कुटील कपटी कुणी नसावे
बळी पशूंचे वत्सल देवी कधी न मागे म्हणे सुनेत्रा
तहान मिथ्या अता सरूदे खऱ्या गुरूला सदा भजावे
वृत् – हिरण्यकेशी, मात्रा ३२
लगावली – ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/