चषकात ओतलेले रंगीत पेय आहे
दारू नका म्हणू तिज हा शब्द हेय आहे
वाईन रंग दिसतो पण ही सुरा नव्हे हो
आनंदकंद रमणी मम गझल गेय आहे
कर्मे करून जगणे घडणे तुझ्याच हाती
करशील कर्म त्याचे तुजलाच श्रेय आहे
नावावरून पारख करणे कधी न बरवे
कोणास तो गणाधिश कोणा अमेय आहे
आत्म्यात देव वसतो नावास अर्थ देण्या
दिलदार मी सुनेत्रा दिलदार ध्येय आहे