वियदगंगा भरुन वाहे तन-मनाने सजल आहे
दगड-धोंडे खडक पात्री पण किनारा मृदुल आहे
धवल साडी हरित बुट्टी विविध रंगी पदर मोठा
लहरणारी झुळुक भासे तरुण कन्या चपल आहे
डुलत चाले लवुन बोले भडक माथी उदक ओते
खुदुखुदू ही हसवितेरे गझल माझी हझल आहे
गगन काळे गडद होता विहरती या जलदमाला
दव लकाके झरुन गाली पवन पृथ्वी अचल आहे
कनक कांती विमल वृत्ती कुसुमबाला रतनचंपा
दहिवराची सुबक जाळी नयनकाठी तरल आहे
धुवट वस्त्रे दशदिशांची खग प्रभाती कुहुकताती
भजन गाते मधुर मीरा हृदयपात्री कमल आहे
चल पुजूया जिनवराला अमल हाती ललित काव्ये
हडळ नाही कुमुदिनीने घडविले हे नवल आहे
वृत्त – वियदगंगा, मात्रा २८
लगावली – ल गा गा गा/ल गा गा गा/ल गा गा गा/ल गा गा गा/