कोमल कुसुमांवरी रंगल्या उडते फुलपाखरू
भृंगासम गुणगुणते गाणे चंचल मनपाखरू
मधमाश्या मधुसंचय करिती बांधुन पोळे छान
लोट सुवासिक वाऱ्यावरती धुंद केतकी रान
आंबेराईवरून येते लहर सुगंध भरली
काटेरी कुंपणावरीही रातराणी फुलली
नीर व्हावया शीतल सुरभित वाळा माठातळी
बंद पाकळ्यांमध्ये जपते परिमल चाफेकळी
ग्रीष्माची चाहूल झळाळी मोद उधळते मनी
कवीमनाच्या पऱ्या बसंती झुलताती अंगणी
असा उन्हाळा सुंदर बाई ऊन ओतण्या तपे
पंचेंद्रियांस न्हाऊ घालत मंतर हा! हा! जपे
तीर्थंकर मंदिरी निघाल्या ललना विशुद्धमती
श्यामल मेघा वाट भिजवण्या वाढव वाढव गती
मात्रावृत्त २७ मात्रा (१६/११)