तरही गझल
मूळ गझल – अरे रावणा हा झमेलाच आहे
गझलकार – विनोद अग्रवाल
अरे रावणा हा झमेलाच आहे तुला जाळते की मला जाळते मी
तुझी खाक लंका जरी होत आहे तिची राख माझ्या तना फासते मी
तुझ्या वीस नेत्री निळ्या अग्निज्वाला जश्या आश्विनाच्या झळा पोळणाऱ्या
दशानन समुद्री हवा वादळी तू तरी चिंब भिजते कुठे वाळते मी
कुण्या गावचा हा नवा येथ वारा फुले चुंबण्याला मला साद घाली
जरी खालमुंडी तुम्हा वाटते मी मनातून माझ्या किती रंगते मी
कळे रावणाला खरा धर्म कुठला तरी अंतरंगी वसे लालसा का
जरी आवडे मज मनापासुनी तो तरीही फुका का तया टाळते मी
खरे मैत्र माझे जुळे रावणाशी कधी द्रौपदीशी कधी अर्जुनाशी
तरीही स्वतःला स्वतःचेच होण्या किती कोसते मी किती चाळते मी
दिशा गंधलेल्या धुके दाटलेले खिरे रात रंगात कैफात झिंगे
तिच्या कृष्णगर्भी गझल रूप घेते तिला जन्म देण्या कळा सोसते मी
सरळ मार्ग आहे शिखर गाठणारा जिथे सत्य कळते हृदय शांत होते
तरी एक आशा तुला भेटण्याची म्हणुन वळण येता पुन्हा थांबते मी
हिवाळा उन्हाळा असो पावसाळा मला नित्य भेटे गुलाबी झमेला
झमेल्यात गुंता नको वाढवूरे जपाया कुटुंबा घरी राहते मी
सुनेत्रास कोणी कितीका छळेना तिचा ध्यास आहे गझल मुक्त व्हावी
गझल श्वास माझा नि विश्वास सुद्धा तिचे भूत जपण्या इथे जागते मी
अक्षर गण वृत्त – मात्रा ४०