वृत्त देखणे फक्त नसावे वृत्तीसुद्धा हवीच सुंदर
गझल असूदे जीर्ण जुनी मम नित्य भासते नवीन सुंदर
प्रभातसमयी शुभ्र मोगरा तप्त दुपारी जास्वंदीसम
सायंकाळी गझल चमेली उत्तररात्री शिरीष सुंदर
काव्य चित्र अन शिल्पामधुनी मूर्त कुणी नारीला करिते
त्याहुन मोहक लेक आपुली गझल बावरी सजीव सुंदर
आकाशाची निळी पोकळी सौरमंडळे ग्रह ताऱ्यांची
पृथ्वी म्हणजे ग्रहगोलांतिल गझल क्षमाशिल भरीव सुंदर
पुत्र धरेचा ऐसा गुंडा दगडांनाही फोडुन पाझर
गाउन घेतो त्यांच्याकडुनी गझल प्रीतिची अवीट सुंदर
घाटदार तनु मृदुल चेहरा अधर सुकोमल नेत्र कट्यारी
याहुन आहे अमूल्य गझले हृदय तुझे हे अतीव सुंदर
मात्रावृत्त (८+८+१६=३२ मात्रा)