वाटेवरले टाळत धोंडे वेल कपारीवरी
जिजीविषेने वर वर चढते वेल कपारीवरी
चढता चढता पुढे लागता संगमरवरी घाट
जगण्यासाठी खाली उतरे वेल कपारीवरी
वेल न म्हणते मी तर नाजुक कशी कळ्यांना जपू
मूक कळ्यांचा भार वाहते वेल कपारीवरी
प्रकाश माती हवेत राहुन पाणी शोषायास
हवे तेवढे वळसे घेते वेल कपारीवरी
ऋतू फुलांचा वसंत येता बहरून सळसळुनी
कळ्याफुलांचा सुगंध उधळे वेल कपारीवरी
गझल मात्रावृत्त (मात्रा २७, ८/८/११, स्वर काफिया गझल )