मौन या ऐन्यास वाचा का बरे सांगा फुटेना
पाहता बिंबास मत्सर औषधालाही मिळेना
मी कसे पटवू तुलाकी बिंब हे माझेच आहे
पांघरीशी वेड म्हणुनी सत्य तुजला बोलवेना
फक्त अपुले ना कुणीरे मालकी दावू नको तू
हक्क सौंदर्यास कोंडे हक्कही तुज पेलवेना
वेळ आली खास जेव्हा मालकी भिरकावण्याची
अंतरी दिसलेच कोणी स्वच्छ चष्मा सापडेना
जीव भावाचा भुकेला जाणुनी हे गझल सजली
मांडता गझलेत हे मी गझल तुज तव ओळखेना
गझलचे सदरे सुखाचे वाटती त्यां काचणारे
फेकुनी ओझे तयांचे येथुनी त्यां जाववेना
नग्नता भावे मलारे फक्त सम्यक्त्त्वी जिवांची
शेर येती सहज ओठी लेखणी आता हलेना
कोलल्या गझला किती तू शेकड्यांनी शेर भरुनी
तीन शेरांची गझल मग आज का तुज कोलवेना
तू नको गाळूस मजला शेवटाचा शेर सांगे
मी ‘सुनेत्रा’ नाव लिहिते नाव मजला सोडवेना
गझल – अक्षरगण वृत्त मात्रा २८
लगावली – गालगागा/४ वेळा