भूचक्रासम गरगर चकली कढईमध्ये नाचत आहे
शुभ्र करंजी चंद्रकलेसम पाटावरती हासत आहे
रवा आणखी बेसन लाडू मोतिचुराच्या वड्या नि चिवडा
तबकामध्ये भरून कन्या आनंदाने वाटत आहे
शंकरपाळी खारी बुंदी अनारशांची नाजुक जाळी
यांची गोडी माय दिवाळी चवीचवीने चाखत आहे
सुतरफेणी बालुशाही नि बिनकाटेरी कडबोळ्यांनी
डबे खचाखच भरून ताई वाट कुणाची पाहत आहे
रांग दिव्यांची अंगणातली सुरेल सनई अन रांगोळी
सुगरण आजी जणू लक्षुमी भरली ओंजळ सांडत आहे