खास मी आहेच इतुकी खास मी केले तुलाही
सावली इतुकेच सुंदर भास मी केले तुलाही
मी फुलांचा मंद परिमल रास तू रचिली जयांची
उधळुनी ती वारियाने श्वास मी केले तुलाही
पळभरीही ना ठरे तू माझिया मिसऱ्यात शेरी
पण तरी जमवून क्षणक्षण तास मी केले तुलाही
धबधब्याचे नीर जणु तू कोसळे वेगे फुसांडे
पाच मम जुळवून बोटे घास मी केले तुलाही
ध्यास तू मम अंतरीचा जाळण्या कर्मे मनाची
पूर्ण मिळण्या मुक्तता विश्वास मी केले तुलाही
अक्षरगण वृत्त – मात्रा- २८
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा/