जमेल तेव्हा ये सवडीने गोष्ट ऐकण्या सुरस खरी
रसिक जनांना मनभावन पण तुझ्यासाठी ती कुरस खरी
नकोच तोरा मिरची पुढती तीच तिखट अन सरस खरी
नकोस गर्जू ओठ फाकुनी नेत्रांमधुनी बरस खरी
एक फूलही सुगंध भरले पुरे त्यांचिया साक्षीला
हव्या कशाला भेटी वस्तू प्रेमासाठी तरस खरी
नकोच स्पर्धा नको परीक्षा नजर भिडव नजरेला तू
तुझ्या नि तिचियामध्ये आता अटळच आहे चुरस खरी
गर्व न तिजला सौंदर्याचा माधुर्याचा तेजाचा
कळेल आता जगास अवघ्या कोण फिकट अन निरस खरी
कुणी न खाण्या येई तुजला बरणीमध्ये नको झुरू
बास जाहले भिजणे मुरणे बरणी फोडुन बुरस खरी
मात्रावृत्त( १६+१४=३० मात्रा)