जुळेल आता खरी कुंडली दोघांचीसुद्धा
नसेल आता वक्र नजर ग्रह गोलांचीसुद्धा
बडबड आता पूर्ण मिटावी सग्यासोयऱ्यांची
सरेल अंतर जुळतिल नाती टोकांचीसुद्धा
वाट पाहणे शिक्षा नव्हती आनंदे सरली
गीते लिहुनी भोगांची अन योगांचीसुद्धा
तत्त्व जाणता धर्म जाहला प्रेमाची भाषा
तीच असावी देहाची अन आत्म्याचीसुद्धा
करे लेखणी तुझी ‘सुनेत्रा’ प्रहार सोट्याचा
घेच काळजी लेखणीतल्या सोट्याचीसुद्धा
मात्रावृत्त – ८+८+१०=२८ मात्रा