झिंग झिंगल्यावरती थिरकत फुगडी सुंदर
एक सांडली सोलापूरी बुगडी सुंदर
पवन मावळी उद्यम नगरी गाव भोसरी
पिंपवडातिल प्राधिकरण अन निगडी सुंदर
फेटे टोप्या हेल्मेटच्या गर्दीमध्ये
उठून दिसते मस्त पुणेरी पगडी सुंदर
शाहूनगरी भटकायाला भारी वाहन
जुनी तरीही स्प्लेंडर आहे तगडी सुंदर
लेकीबाळी नटून बारामतीत फिरती
विकावयाला सुबक बोळकी सुगडी सुंदर
मम् गझलेच्या जमिनीवरती पाय रोवुनी
गगन चुंबते भव्य हवेली दगडी सुंदर
लंडनच्या बाजारी आल्या नेसून नारी
नऊवार नवरंगी इरकल लुगडी सुंदर
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)