काहीच ना मी बोलले
त्यांचेच त्यांना झोंबले
उपदेश सारा ऐकला
अन घ्यायचे ते घेतले
गोष्टी जरी होत्या जुन्या
मी त्यात मजला शोधले
गझलेत मी बुडले जरी
मी ना कधीही गंडले
ज्यांना मिळाले फुकटचे
त्यांनीच पैसे वाटले
बोलाल जर उडवू तुम्हा
फर्मान त्यांनी सोडले
त्यांनी न लिहिली ओळही
पण अर्थ मोठे काढले
निंदाच करुनी छापल्या
परखड समीक्षक जाहले
मी केवढा केला गुन्हा
गप्पात त्याच्या रंगले
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/