इलाहींच्या गझलांमधून स्त्रीवाद :
स्त्रीवादी साहित्य, स्त्रियांचा संघर्ष, व्यथा वेदना व्यक्त करणारं साहित्य, स्वतः स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य हे निरनिराळ्या प्रकारचं असू शकतं. स्त्रीवादी काव्य म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आधी स्त्रीवाद म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवं.स्त्रीवाद ही स्त्रीला तिच्या हक्कांची तिच्या होणाऱ्या शोषणाची जाणीव करून देणारी चळवळ आहे. स्त्रीला तिच्या माणूसपणाची आणि आर्थिक, वैचारिक आणि निर्णयक्षमतेच्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणारी ही चळवळ आहे. स्त्रीला आत्मनिर्भर बनवणे, खऱ्या मुक्तीचा अर्थ समजावून देणे हा स्त्रीवादी चळवळीचा प्रमुख उद्देश आहे.
स्त्रीने स्वतंत्र होणे म्हणजे पुरुषांसारखे रक्त बनणे, विवाहबंधन झुगारून देणे असे नसते. स्त्री म्हणून जगताना तिने स्वतःचा आदर करणे व दुसऱ्यांनीही तिचा आदर करावा म्हणून सतत जागरूक असणे आवश्यक असते.
स्त्रीच्या अशा वेगवेगळ्या जाणिवा व्यक्त करणारं, तिला प्रगल्भ बनवणारं, बाईपणाच्या ओझ्यातून मुक्त करणारं जे काव्य किंवा साहित्य असतं ते स्त्रीवादी असतं.
स्त्रीने स्वतःचा देह, व्यक्तिमत्त्व, आरोग्य, सौंदर्य, कार्यकुशलता फक्त पुरुषाला रिझवण्यासाठी त्याचा वंश वाढवण्यासाठी, त्याचं कौतुक मिळवण्यासाठी वापरावं अश्या प्रकारच्या विचारप्रणालीला स्त्रीवादी साहित्य विरोध करतं. स्त्रीवादी साहित्य स्त्रीला तिच्या स्व ची जाणीव करून देतं.
इलाहींच्या गझलांमधून असा स्त्रीवादी दृष्टिकोन, जाणिवा व्यक्त झालेल्या आहेत. उदा.
स्त्रीमुक्तीची तुझी भाषणे वाचलीत मी दैनिकातुनी
तुझ्याच कैदेमधल्या तू ला सोडायाची इच्छा नाही
किती पुस्तके वाचलीस तू ग्रंथ स्वतःचा वाच एकदा
बासणात तो छान वाटतो उघडायाची इच्छा नाही (मोगरा पृ. ३४)
घाण्याचा बैलासम अविरत फिरते आहे कैदेमधुनी
झुगारून हे बंधन द्यावे या धरतीने एकदा तरी
अष्टप्रहर हा सक्त पहारा आकाशाचा चराचरावर
स्वातंत्र्यास्तव बंड करावे या धरतीने एकदातरी (मोगरा पृ. ९)
दरवळणारी कोमल काया रंगरूप लाघवी असे
खडा पहारा काट्यांचा लिहिला नशिबात गुलाबांच्या (मोगरा पृ. ५४)
नारीचीही नागिण बनते नकोस विसरू
सहनशीलता आहे तोवर नारी आहे.(मोगरा पृ.१४)
मोर्चा अन घेराव फुलांचा संपावर वाटिका बने
पहा निवेदन जातसे म्हणे मी स्वप्नात गुलाबांच्या (मोगरा पृ. ५४)
मित्र, मैत्री,मैत्र ही ती बेगडी बाराखडी
तीच ती नकली फुले बघ माळली आहेस तू (अर्घ्य)
पेल्यात पैंजणांचे चित्कार ऐकले मी
कोठीतल्या कळ्यांच्या मरणास अंत नाही (जखमा अशा सुगंधी पृ.२७)
हे असे बागेवरी उपकार केले
कत्तली करूनी फुलांचे हार केले
आजही लावण्य आहे लाघवी पण
यौवनाचे का असे बाजार केले (जखमा अशा सुगंधी पृ.२४)
नकोस समजू स्वतःस उल्का एक लाघवी कलिके
सुगंधीत अन तेजोमय का असते कुठली उल्का (भावनांची वादळे पृ.२७)
अशा शेरांमधून स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाची दखल फक्त पुरुषानेच नाही तर स्वतः स्त्रियांनीही घेणे किती गरजेचे आहे हे जाणवते.
स्त्रीच्या केवळ बाह्य सौंदर्यावर किंवा तिच्या समर्पित प्रेमावर लुब्ध होऊन लिहिलेले काव्य स्त्रीवादी कधीच नसते. पण चांदणचुरा या संग्रहातील पुढील मुक्तक स्त्रीला तिच्यामधील ठिणगीची जाणीव करून देण्यास पुरेसे आहे.
तुला वाटते मदीर मादक ओठांवर मी मरतो
तुझ्या टपोऱ्या अन तेजोमय नयनांवर मी मरतो
जिकडे तिकडे राख पसरली कुठे निखारा नाही
पुन्हा एकदा आग लाव तू वणव्यांवर मी मरतो (चांदणचुरा )
KRAMASH: