इलाहींच्या गझलेतील प्रेम व इतर भावनेचा अविष्कार :
इलाहींच्या सर्वच गझल संग्रहातून प्रेम, श्रुंगार, विरह, प्रेमभंग, प्रेमपूर्ती या पारंपरिक विषयावरील गझला विपुल आहेत, खरेतर त्यांच्या कुठल्याही गझलेचा स्थायीभाव प्रेम हाच आहे. कारण गझल हाच मुळी हृदयातून उचंबळलेल्या प्रेमभावनेचा सहजोद्गारही.
वासनेला प्रेम समजणारे खरे प्रेम करूच शकत नाहीत. म्हणूनच प्रेम या विषयावर बोललेले लिहिलेले त्यांना आवडत नाही.
समाजात वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात. काही समाजसेवेचा खोटा बुरखा पांघरलेले असतात. काही पोकळ पांडित्याने भारलेले असतात. त्यांच्या मते लिहायचंच असेल तर समाजातल्या दैन्यावर लिहा. झुंडशाही गुंडशाही यावर लिहा. पोटासाठी नाचणाऱ्या बारबालांच्या प्रश्नांवर लिहा. बोकाळलेल्या जातीयतेवर लिहा, जातीयतेची शिकार झालेल्या कर्मठ कूपमंडूक जातींवर लिहा, अनाथ मुले, वृद्ध, हुंडाबळी यांच्या प्रश्नांवर लिहा साक्षरता अभियानावर लिहा.
त्यांच्या मते प्रेमाचे काव्य लिहून प्रेमाचे प्रश्न सुटत नसतात. म्हणून त्यांना वाटतेकी प्रेमाच्या स्वप्नसृष्टीतून कवी लोकांनी बाहेर यवेव फक्त वास्तव जगातल्या ज्वलंत प्रश्नांवर लिहावे.
ज्याला अशा प्रश्नांवर मनापासून लिहायचे असते तो यावर लिहितोच आणि ते त्याने जरूर लिहावे. पण मानवी हृदयाचा सर्वप्रथम विचार केल्यास साऱ्या भावना चक्राच्या केंद्रस्थानी प्रेम आणि रती या भावना असतात. या भावनांना टाळून कोणीही खरीखुरी आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकत नाही.
या केंद्रस्थ भावनेची कळ दाबूनच सारे भावनाचक्र गरगर फिरवले गेल्याशिवाय तळागाळातला कचरा वर येत नाही. जेवढ्या वेगाने हे भावना चक्र फिरेल तेवढ्या वेगाने केरकचरा कुभावना राग लोभ मत्सर , कामवासना नष्ट होतील आणि मग यानंतरच खरीखुरी वासना विरहीत प्रीती निर्माण होईल. ही प्रीती मग आई वडिलांवरची असेल, प्रेयसीवरची असेल, प्राणिमात्रांवरची असेल, समाजावरील असेल, देशावरील असेल किंवा परमात्म्यावरील असेल.
भावनांचे वादळ उठलेकी तिच्या वेगाबरोबरच विचारही फिरू लागतात व एका विशिष्ट क्षणी विचार आणि भावना एकरूप होतात. अशी अवस्था काव्य निर्मितीला कारण ठरते. काव्यनिर्मिती होण्यासाठी फक्त विचारांना केंद्रस्थानी ठेऊन वेगळे काही करण्याची गरज नसते.
अर्घ्य या संग्रहातील बहुतेक गझला या कवीला प्रिय असणाऱ्या व्यक्तीवरील उत्कट प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या कधी विरह व्यथेने पोळलेल्या भग्न हृदयाचे एकाकीपण व्यक्त करणाऱ्या आहेत.
अर्घ्य या संग्रहातील बहुतेक गझला या कवीला प्रिय असणाऱ्या व्यक्तीवरील उत्कट प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या कधी विरहव्यथेने पोळलेल्या भग्न हृदयाचे एकाकीपण व्यक्त करणाऱ्या आहेत.
स्त्री आणि पुरुष यांचे वास्तव सहजीवन कसेही असो पण स्त्रीपुरुषांमधल्या नाजूक नात्याचा शुद्ध मनाने वेध घेणाऱ्या आहेत. कधी कधी त्यांचे प्रकटीकरण थोडे भडक वाटत असले तरी त्या प्रामाणिक आणि तीव्र ही आहेत. म्हणूनच त्यावर व्यक्तीकेंद्रितपणाचा आरोप करावा वाटत नाही. उदा.
गतजन्मीचे वैर असावे भेटलीस तू सखये
सूड घ्यायला माझा माझी जाहलीस तू सखये
होता कधी चांदवा बनला आता वणवा
आग होऊनी हृदयावरती बरसलीस तू सखये
भुजंगापरी तुझी वैखरी डसत राहिली मजला
‘इलाही’स किती विखारी बोललीस तू सखये (अर्घ्य)
ही गझल असो की
भिंत दोघांच्यामधे का बांधली आहेस तू
केवढी माझ्यावरी संतापली आहेस तू
काल मी स्वप्नी तुला आक्रंदताना पहिले
टवटवी हरवून बघ कोमेजली आहेस तू
मुखवटे लावून तुजला भेटलेले पारधी
सापळ्यामध्ये तयांच्या अडकली आहेस तू (अर्घ्य)
ही गझल असो या गझलांमधून तिने दिलेल्या वेदनांनी तडफडणारे कवी ह्रदय जसे पाहायला मिळते तसे तसेच तिच्यासाठी आक्रंदणारे कवी हृदयही पहायला मिळते. असं हे आक्रंदणारे हृदय त्याला जाळणाऱ्या चिरडणाऱ्या तुडवणाऱ्या दुसऱ्या एका हृदयाला जाब विचारीत आहे
काय नेमके चुकले सांगशील हृदयाचे
अजुन किती वाभाडे काढशील हृदयाचे
किती भावकलिका तू चिरडल्यास पायतळी
पांग कसे कोठे फेडशील हृदयाचे
भस्म जाहला अखेर उत्पाती भस्मासुर
जाळतील हात तुला सहनशील हृदयाचे
(अर्घ्य)
दुसऱ्याला भस्मसात करणारा स्वतःही कधीतरी भस्मसात होतच असतो. म्हणूया सहनशील ह्र्दयाच्या हृदयाने कितीही सहन करायचे ठरवले तरीही त्या हृदयाचे हात मात्र तुला जाळल्याशिवाय राहणार नाहीत.
कुंभार जसा चिखल तुडवितो तसे तू माझ्या कोमल भावभावनांना तुडवलेस पण त्यामुळे माझे काय वाईट होईल? उलट चिखलातून नवीन घाटदार कुंभच तयार होईल. पण तू मात्र त्या हृदयाचा तळतळाट भोगल्याशिवाय राहणार नाहीस.
असं हे हृदयाचं आक्रन्दन, रुदन प्रामाणिकपणे प्रकटलेलं आहे. पोळलेल्या भग्न झालेल्या हृदयातून प्रेमभंगाचे दुःख व्यक्त करणाऱ्या या गझला मर्यादित भावविश्व् लाभलेल्या असल्या तरी त्यातली भावना लपवाछपवीची वाटत नगी. स्वतःच मोठेपण फुगवून सांगणारीही नाही. जे जे वाटलं ते ते मनाच्या त्या त्या भावोत्कट स्थितीत अगदी प्रामाणिकपणे कागदावर उतरलेलं आहेआणि म्हणूनच त्याचंही एक वेगळं मोल आहे.
प्रेयसीकडून प्रियकराला गुलाबाचीच अपेक्षा असते. यासाठी काट्यांमध्ये हात घालायचीही त्याची तयारी असते. फुले मागितल्यावर काटे देणाऱ्या प्रेयसीचा काट्याप्रमाणे रक्षणकर्ता बनूनही राहण्याची त्याची तयारी असते. कारण तिचं प्रेम काटेरी असलं तरी त्याच्या वाटेवरचे काटे वेचणारेही असतं. याची त्याला मनोमन खात्री असते. असं काटेरी प्रेम व्यक्त करणारी ही गझल.
गुलाब म्हटले सखये तुजला तू दिलेस काटे
खुडून स्वप्ने माझ्या नयनी माळलेस काटे
जगावेगळी भेट तुझी ही आवडली सखये
माझ्यासाठी कसले कसले आणलेस काटे
खरेच तुजला नाही पटली ओळख काट्यांची
रक्षणकर्ते हितचिंतक अव्हेरलेस काटे
सांगशील का ‘इलाहीस’ तू एवढेच आता
तूच पुन्हा का वाटेवरचे वेचलेस काटे
अशी ही प्रेमभंगातून मिळालेली आक्रन्दने जी रत्ने गळून गेलेल्या कोंदणाप्रमाणे असतात. ती सुद्धा कवीमनाला प्रियच असतात. कारण कवी तर केवळ आनंदपिपासूच असतो. प्रत्येक गोष्टीतून आनंद वेचण्यासाठीच त्याचा जन्म असतो. ती जरी उल्केप्रमाणे गोठलेली थिजलेली असली तरी तिच्या नजरेत कोरलेला टपोर तारा आणि त्यातली स्पंदनं फक्त कवीच अनुभवू शकतो. त्याला दूषणे देणाऱ्या कळ्यांनाही तो दोष देत नाही. त्याचे कारणही तो फक्त स्वतःतच शोधतो. कारण स्वतःतले दोष काढून त्याला बाह्य जगतातून फक्त आनंद आणि आनंदच मिळवायचा असतो.
आनंद वेचताना आक्रन्दने मिळाली
रत्ने गळून गेली मज कोंदणे मिळाली
नजरेत कोरलेला होता टपोर तारा
उल्केत गोठलेली मज स्पंदने मिळाली
प्रत्येक पाकळीला सन्मान जो दिला मी
का लाजऱ्या कळ्यांची मज दूषणे मिळाली (अर्घ्य)
यात कवी शेवटी म्हणत आहे, अगोदरच फुललेल्या फुलाच्या प्रत्येक पाकळीला मी सन्मान मिळवून दिला यात काय मोठेसे? मी असे केल्यामुळेच तर ज्या न उमललेल्या लाजऱ्या बुजऱ्या कळ्या होत्या त्यांची मला दूषणे मिळाली.
भावना मग ती झुळूक बनून येवो की अवखळ वाऱ्याच्या रूपात येवो ती काहीतरी घडवून अंतेच. जे करू नये ते सुद्धा करते. भर बाजारात कुणा लावण्यवतीचा पदर उडवते तर कधी कोणा मुग्ध्येच्या मनात श्वासात प्रीतीचा दरवळ भरते. भर बाजारात ती असा गोंधळ उडवून देते.
करू नये ते केले होते अवखळ वाऱ्याने
श्वासांमध्ये भरला माझ्या दरवळ वाऱ्याने
लावण्याशी वैर म्हणूकी स्वैर वागणे हे
भर बाजारी पुन्हा घातला गोंधळ वाऱ्याने
कधी जाहला मंद झुळूक तर झंझावात कधी
अनेक रूपे धारण केली वादळ वाऱ्याने (भावनांची वादळे)
अशी अनेक रूपे धारण करणाऱ्या भावनांचे वादळ वारे अगदी परम उत्कर्षाला म्हणजे कळसाला पोहोचल्यानंतर काही काळ जे saturation निर्माण होते ते मनाला तडागाप्रमाणे शांती मिळवून देते. आयुष्यभर किंवा काही काळ तनामनावर घोरपदीप्रमाणे चिकटून बसलेली मरगळ जणू ठार होते.
घोरपडीसम चिकटून होती तनामनावरती
संध्यासमयी ठार मारली मरगळ वाऱ्याने
ही जी झुळकीसारखी वाटणारी कमालीची शांत एकसंध भावना जेव्हा मनात काही काळापुरती टिकून राहते तेव्हाच तत्वज्ञान निर्माण होत. परमेश्वर भेटीची ओढ याच काळात निर्माण होते. त्यांनतर मग परमेश्वर आडवाटेने भेटो किंवा राजमार्गाने जाऊन भेटो ते प्रियच असते. पण त्यासाठी आजूबाजूच्या बकाल गर्दी गोंगाटाप्रमाणे मनातल्या विकारांच्या गोंगाटापासून दूर राहायची तयारी असावी लागते.
माणसं हरघडी बदलतात.पण पंचतत्त्वे कधी बदलतात का? त्यांचा स्वभाव कधी बदलतोका? शीतलता हाच पाण्याचा स्वभाव असतो. हा स्वभाव पाणी कधीच सोडत नाही. ते वाहत असतं कोसळत असतं. कधी ते गोठून बर्फ होतं तर कधी तापून वाफ होतं, पण पाणी कधी जळलेलं पाहिलं आहे का? नाहीच. कारण जळणे हा पाण्याचा स्वभाव नाही. ते जळणाऱ्याला शांती देतं.
बर्फ पाहिला, वाफ पाहिली
दिसलेका जळलेले पाणी?(भावनांची वादळे)
कवी हा निसर्गाशी समाजाशी आपलया प्रिय व्यक्तींशी परमात्म्याशी काव्याने जोडलेला असतो. काव्यातल्या प्रेमाने जोडलेला असतो.
स्वतःची भूमिका न सोडता समोरच्या व्यक्तीशी, सृष्टीशी जास्तीत जास्त समरस होण्याची जी वृत्ती असते, ती काव्यातली सविकल्प समाधीचं असते. मनातली प्रेमभावना प्रबळ होऊन जेव्हा कळसाला पोहोचते तेव्हा क्षणभर का होईना पण मनाची समाधीच लागते. ही समाधी घ्यायची म्हणून अट्टाहासाने घेतलेली नसून आपोआप लागलेली असते.
ओऍसिस या संग्रहातील समाधी घेतली नाही समाधी लागली आहे (गझल-१आणि गझल-२) या गझलांमधून मनाची ही समाधी अवस्था स्वतः कवीने जी पाहिली ती आपल्याला पण पाहायला मिळते.
समाधी घेतली नाही समाधी लागली आहे
मनाची ही अवस्था मी स्वतःही पाहिली आहे.
कधी किरणात ती असते कधी बुरख्यात तिमिराच्या
सखी सहचर प्रिया माझी स्वतःची सावली आहे.
येथे कवीला लागलेली ही समाधी सविकल्प समाधी आहे. त्यामुळे तिची वेगवेगळी रूपे कवी अनुभवतो आहे. कधी नीरवता हे तिचे रूप आहे कधी ती किरणात उजळून निघालेली आहे तर कधी तिमिराचं बुरख्यात लपलेली आहे. कधी ती स्वतःच्या सावलीप्रमाणे भासते. तिची अशी वेगवेगळी रूपे कवी अनुभवतो.
विचारांची कुडी येथे मघाशी गाडली होतो
पहा क्षण संपण्याआधी पुन्हा अंकुरली आहे
मना एकाग्रता आली ग्रहणशीलता उमगलेली
स्वतः स्थितप्रज्ञ झाल्याची अवस्था जाणली आहे
जरी मी झोपलो असलो तरी जागाच मी असतो.
कधी शून्यात वावरतो कधी मी सावली आहे
सविकल्प समाधीत शून्याप्रती गेल्याचा फक्त आभास होत असतो. आपण पूर्णतः शून्य झालेलोच नसतो. एक क्षण असा येतोकी , त्यावेळी असे वाटते की विचारांची कुडी गाडली गेली आहे. आणि त्यावेळी टी फक्त गाडली गेलेली असते. नष्ट झालेली नसते. म्हणूनच क्षण संपण्याआधीच तिचे अंकुरणे पुन्हा सुरु होते.
मन एकाग्र होण्याचा कालावधी वाढत गेला की, स्वतः स्थितप्रज्ञ झाल्याची अवस्था आपण अनुभवत असतो. आपली जाणीव पूर्णतः शून्य आलेलीच नसते. कारण ही निर्विकल्प समाधी नसून वाङ्मयात वर्णन केलेली सविकल्प समाधी असते.
रिकामे हात हे माझे नको पाहूस तू वेड्या
पहा माझ्यासवे संतोष शांती चालली आहे.
नवी आभा मिळालेली नवे तेज आलेले
इलाही काजळी आता मानाने झटकली आहे
तर हि सविकल्प समाधी असली तरी ही अवस्था सुख शांतीने भरलेली असते. हात जरी रिकामे तरी ह्रदयातील आनंद मात्र त्यात न मावणारा असतो. त्यामुळे मनावरची संकल्प विकल्पांची काजळी आपोआपच दूर होते.
इलाहींच्या काव्यातला प्रेम व इतर भावनांचा अविष्कार आपल्याला शेवटी एका अध्यात्मिक पातळीवर नेऊन सोडणारा आहे.
चांदणचुरा या मुक्तक व रुबायांच्या संग्रहात प्रेम, अध्यात्म, सकारात्मक दृष्टिकोन या विषयावरील अनेक मुक्तके चांदण चुऱ्याप्रमाणे विखुरली आहेत.
परमेश्वराप्रती असणारे प्रेम आणि भांडण हे सुद्धा आपल्याला तत्त्वज्ञानच सांगत असते.
” तुझे मौन ” या ५७७ शेरांच्या प्रदीर्घ गझलेतून उलगडत गेलेल्या मौनाची भाषा व तिच्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या अर्थच्छटा यांचे दर्शन म्हणजे परमेश्वराचे सर्व चराचर सृष्टीशी असलेल्या प्रेमभावनेचेच साकार रुतो आहे.