लावली मेंदी न हळदी रंग चढण्या उतरण्याचा प्रश्न नाही
भाव नयनातून झरती मज कुणीही रडवण्याचा प्रश्न नाही
बिघडवू दुसऱ्यांस का मी बिघडुनी घडले स्वतः मी वेळ येता
खुद्द माझ्या लेकरांना घडविले ना बिघडण्याचा प्रश्न नाही
माणसांच्या साखळीने बंगला ना लाटण्याचे स्वप्न माझे
आपले झाले खुशीने तेच सच्चे अडवण्याचा प्रश्न नाही
नोकरी धंदा कुणाचा कोण करती मिरवण्या की नाइलाजे
त्या जुन्या उकरून गोष्टी संपवील्या चघळण्याचा प्रश्न नाही
बोलण्याची रीत माझी काढणारे बोलुनी चुकले “सुनेत्रा”
मूळ कारण जाणणारे मूक झाले वदवण्याचा प्रश्न नाही