छुमछुम छुमछुम पैंजण वाजे पानाभवती
उदक सुगंधी दवबिंदूंचे पानाभवती
पदन्यास कलिकांचे पाहुन दिशा उजळता
कुंदफुलांसम गझल डोलते पानाभवती
चिंब वल्लरी हळद माखली फुले सुगंधी
परिमल प्राशुन वारा नाचे पानाभवती
झरझर विणते घालित टाके पाऊस धार
सळसळणारे अक्षर पाते पानाभवती
आरसपाणी पान भुईचे तयात अपुले
बिंब पाहण्या गगन उभे हे पानाभवती
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)