रंगल्या पूर्वेसवे तू रंग ते लेऊन ये
कोवळ्या किरणांसवे तू संपदा घेऊन ये
गातसे आकाश गझला पंख तू पसरून ये
कुंकवाला शुभ्र भाळी आज तू रेखून ये
कैद करण्या शृंखला या ठेवल्या नाहीत मी
थांबली गाडी जरी ना साखळी खेचून ये
येच उल्के भूवरी या बहरण्या फुलण्या गडे
वाटली ‘भीती’ जरी ‘तिज’ अंबरी फेकून ये
हा मनाचा खेळ नाही स्वप्न हे सत्यातले
रेशमी ते वस्त्र वाऱ्या तू पुन्हा उडवून ये
साठ वर्षे पूर्ण व्हाया जाउदे वर्षे सहा
तरुण मी आहेच आहे झाड तू हलवून ये
झाड माझ्या अंतरीचे डोलते आहे अता
पाहण्या मोहर तयाचा हृदय तू घेऊन ये
अक्षरांना लेखणीने लिहित नाही मी जरी
हलव तू फांद्या मनाच्या अक्षरे वेचून ये
क्रुद्ध मी नव्हतेच झाले शब्द होते पेटले
संपवाया हा अबोला फक्त तू पेटून ये
पंचतत्वे तोलुनी मम देहलतिका डोलते
स्पर्शिण्या काया फुलांसम पवन तू होऊन ये
बेरकी डोळे किती हे जाणती कावे छुपे
भिडविण्या डोळ्यांस डोळे ऐनका टाळून ये
भय तुला आता कशाचे पकड त्या वेगास रे
कुंपणाशी थांबशी का कुंपणे लंघून ये
घे तळी येथे विसावा वृक्ष डेरेदार हा
पोचशी वेळेत आता वेळ तू पाहून ये
बोलते ना ती जरी रे मौन सुंदर बोलते
चेहरा लिहितोच कविता काव्य ते वाचून ये
आटले पाणी कढीतिल दाट ती झाली किती
ती पुन्हा रसदार होण्या त्यात जल ओतून ये
मोकळ्या केसात लाटा लहरती अन विहरती
लहरण्या अन बहरण्या तू लाट ती चुंबून ये
उतरण्या घाई कशाला घे दमाने तू जरा
जवळ आले टोक आता जाउनी गाठून ये
शीक तू वाचायला रे माणसांचे मुखवटे
झळकतो ज्यातून मी मी शब्द ते खोडून ये
सत्य सुंदर सर्व काळी जाणणारी माणसे
एकदा भेटून त्यांना चरण ते स्पर्शून ये
जाण सामर्थ्यास तुझिया घडव तू तव प्राक्तना
वाहत्या प्रेमात सुंदर हात तव भिजवून ये
घे भरारी पसर पंखां जवळ आला स्वर्ग हा
स्वर्ग आहे अंबरी पण त्यास तू झुकवून ये
काप कैऱ्यांचे करोनी घाल त्याला फोडणी
लोणचे घालून फक्कड चव जरा चाखून ये
कैक नांग्या विंचवांच्या पसरल्या मार्गात या
पाहुनी तू टाक पाउल त्यांस रे टाळून ये
गोडवा आहेच हृदयी मुक्तहस्ते वाट तू
तीन लोकीचा जिव्हाळा आज तू मिळवून ये
व्यंगचित्रे बोलणारी चालणारी वाटती
वागणे मार्मिक त्यांचे तेवढे जाणून ये
तापले नेते कशाने ऊन ना लागे तरी
तापुनी त्यांच्यासवे मग तू जरा वितळून ये
संशयाला टाळ थोडे मोकळा हो रे जरा
संशयाला अंतरीच्या पूर्ण तू जाळून ये
तेवते पणती इथे ही उजळण्या घरकूल हे
तो दिवा विझला विझूदे संशया विझवून ये
हलविशी का व्यर्थ पडदा जायचे आहे मला
राहिलेले काम सारे पूर्ण तू उरकून ये
वृत्त — गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.