आई म्हणजे पैंजण छुण छुण
आई नाजुक कंकण किणकिण
आई नसता घरात भणभण
आई असता नसते चणचण
छळे गारठा जेव्हा जेव्हा
आई बनते मऊ पांघरुण
शिणल्यावरती कुशीत घेण्या
आई बनते कधी अंथरुण
नीज यावया मला सुखाची
आई गाते मंजुळ रुणझुण
फुलाफुलातुन सुगंध उधळित
आई व्यापे अवघे कणकण
सुखी कराया तिची लेकरे
आई करिते अखंड वणवण
नकोस जाऊ अता कुठेही
आईमागे सदैव भुणभुण
बांधिन चाली तिच्या सुरांवर
आई करिते जेव्हा गुणगुण
मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)
One response to “आई – AAEE”
खूप भावस्पर्शी कविता. मांडणी अतिउत्तम, वास्तविक असून अलंकृत आहे !