दवबिंदुंचे उदक साठवुन सहाण भरली हसली
काष्ठ चंदनी फिरता वरती फूल सुवासिक बनली
बनी केतकी नागिण फिरते सळसळणारी चपला
कैद कराया तिज बुंध्याला बिजलीने कंबर कसली
पुष्पपरी मी उडेन आता म्हणत म्हणत ती पडली
मृद्गंधित घन मातीमध्ये लोळुन लोळुन दमली
चपळचंचला संयमधर्मे उडून जाता स्वर्गी
नागफण्यासम श्यामल सुंदर वीज नभी लखलखली
वनहरिणी ती ऐकत गाणे हरिण-कस्तुरी झाली
स्वर्गामधल्या घरी ‘सुनेत्रा’ आनंदाने रमली
मात्रावृत्त (८+८+८+६=३०मात्रा)