स्वरात कंप कापरा अधीर मस्त नाचरा
मधाळ धुंद बावरा अधीर मस्त नाचरा
कवाड बंद का असे उनाड वात तापण्या
झरावयास मोगरा अधीर मस्त नाचरा
लिहावयास लावणी भिजेल आज टाकही
बनेल लाज-लाजरा अधीर मस्त नाचरा
तुलाच चुंबिण्या प्रिये झुलेल श्रावणात तो
उडे धरून कासरा अधीर मस्त नाचरा
कपोत हूड गोल तो खुलेल पावसात या
म्हणेल गाच पाखरा अधीर मस्त नाचरा
गुपीत राज सांगुनी मलाच वाच साजणा
बघेन फेस हासरा अधीर मस्त नाचरा
सताड स्वर्ग पाहुनी समीर आत ठाकला
ढगास देत हादरा अधीर मस्त नाचरा
मलाच माझियामधे बळेबळेच कोंबुनी
दिसेल ‘तू’ च साजरा अधीर मस्त नाचरा
नकोच भांडणे अता छचोर कंटकांसवे
म्हणे गुलाब आवरा अधीर मस्त नाचरा
जळोत या इडापिडा बलाक दृष्ट काढिती
म्हणेल काक सावरा अधीर मस्त नाचरा
सुनेस त्या लगावल्या लगावुनी अश्यातश्या
बसेल स्वस्थ सासरा अधीर मस्त नाचरा
तुरूतुरू न चालतो लगालगा ससा निघे
चढून जाय दादरा अधीर मस्त नाचरा
निरांजनात तेवता सतेज ज्योत सानशी
भरेल स्वच्छ कोपरा अधीर मस्त नाचरा
करी कशास कुंचला मनास रंग द्यावया
चिनार मी हराभरा अधीर मस्त नाचरा
रसाळ पूर्ण गोड जे सुगंध रंध्र व्यापते
अशा फळातला गरा अधीर मस्त नाचरा
जलाशयात चांदणे टिपूर लख्ख सांडले
जणू मयूर नाचरा अधीर मस्त नाचरा
प्रकाशल्या दहा दिशा तमास पिंजुनी जुन्या
नवा ऋतू म्हणे धरा अधीर मस्त नाचरा
‘सुनेत्र’ हे तुझेच रे तुला सदैव पाहती
तुझा सलील चेहरा अधीर मस्त नाचरा