गरगरूदे जग जगाचा आस धर तू
भिरभिरू दे मन मनाचा फास धर तू
चाबरे हे लोक सारे शांत झाले
बावर्यांचा कान आता खास धर तू
आवरे मी गडबडीने पण तरीही
‘छान दिसते’ ही तिची बकवास धर तू
माफ करतिल सर्व गुरुजन ज्या क्षणी मज
त्या तिथीला खाउनी उपवास धर तू
त्या दिशीका वाटले तिज तरकले मी
जाहला जो भास तिजला त्यास धर तू
लाजले नव्हते तरीही रंग गाली
उतरला होताच नकळत त्यास धर तू
ते तुझे जपणे मला रे स्वप्न नव्हते
जो दिला एकांत अन सहवास धर तू
मस्त ती साडीत दिसते म्हणतसे तो
त्या कवीची गझलवेडी प्यास धर तू
मदफुलोरा गळुन जाता रिक्त होशिल
प्रीत सच्ची बहरण्या मधुमास धर तू
भेट तो देणार होता त्या डब्यातिल
मृदु गुलाबी पावडर ती खास धर तू
जाणते मी आवडी साऱ्या तुझ्याही
आवडीचा माझिया अधिवास धर तू
शरद सुंदर मनप्रभाती गच्च पसरे
त्या धुक्याच्या मलमली वसनास धर तू
मानवा तू जीवनी या तृप्त होण्या
जे न लोपे त्या सुखाची आस धर तू