वर्षते श्रावणात आता ती
वेचते पारिजात आता ती
जहरिली तोडण्यास नक्षत्रे
होतसे काळरात आता ती
सापडे ना इथे कुणालाही
राहते अंबरात आता ती
मोजुनी अचुक सर्व मात्रांना
माळते कुंतलात आता ती
कूप ना आवडे बघ तिला हे
डुंबते सागरात आता ती
चांदणे उधळते करांनी दो
नाचते आश्विनात आता ती
लज्जिता भामिनी सुनेत्राला
पाहते लोचनात आता ती
वृत्त -लज्जिता, मात्रा -१७
लगावली – गा ल गा/गा ल गा/ल गा गा गा