लिहीन काही नवे नवे मी
सुचेल जे जे मला हवे मी
कलम असे गुज करे वहीशी
पुन्हा पुन्हा तेच आळवे मी
थकेल जेव्हा रुमाल माझा
टिपून घेईन आसवे मी
जरीन दांडू करात माझ्या
चुकार विट्टीस टोलवे मी
उडवित बसते निळ्या मनाचे
प्रभात होता नभी थवे मी
निळ्या समुद्रास गाज सांगे
रड्या तरंगास हासवे मी
निघेन रात्री फिरावयाला
निवांत शोधीत काजवे मी
वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६
लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा गा