कराल दाढेतुनी सुटाया मलाच मृत्यू विनवित आहे
खरेच का मी समंध भूत्या उगा कुणाला झुलवित आहे
मला न कळते यमास सुद्धा खरेच कारे असे मरणभय
म्हणून तोही धनुष्य ताणुन शरांस माझ्या अडवित आहे
जुनाट कर्जे करून चुकती पुरापुरा मी हिशेब दिधला
अता उधारी तुझ्याचसाठी मला परी ती सुखवित आहे
हसून दुःखे किती उडविली हृदय सुखाने तुडुंब भरले
उणे न काही मला कशाचे नभी खुशाली कळवित आहे
मला दुखवशिल विसरुन जाशिल असे कधी भय मला न वाटे
महापुरुष तू तुलाच मित्रा लिहून गझला रिझवित आहे
वृत्त – हिरण्यकेशी, मात्रा ३२
लगावली – ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/