चुटूक लाली तव अधरांची टिपून घेते रसाळ चेरी
सुरभित रसमय गऱ्यास खाण्या तुला खुणविते खट्याळ चेरी
अनंत बागा धरेवरी या फुला-फळांच्या फुलून भरल्या
भरून येण्या तव रसवंती मधाप्रमाणे मधाळ चेरी
तुझ्या मनातिल तरंग कोमल वहात जाण्या नदीकिनारी
रदीफ मोहक मम गझलेचा जणू कमलिनी दवाळ चेरी
टपोर माणिक जणु पदरावर तशीच बसते सजून पानी
कितीक खोड्या तिच्या बघोनी म्हणेल कोणी टवाळ चेरी
रुई चमेली बकुल फुलांची मृदूल स्पर्शी गव्हाळ कांती
बघून हसते स्वतःत रमते नवी नवेली नव्हाळ चेरी
कुमारिकेसम रमण रुपाची धवल गुणांची सतेज बाला
पहाटलाली हळद नि कुंकू तशी हिवाळी सकाळ चेरी
जिथून कृष्णा निघे प्रवासा तिथे तरूंवर घडात शोभे
जहाल कंटक शरांस झेलत कधी न बनते मवाळ चेरी
वृत् – हिरण्यकेशी, मात्रा ३२
लगावली – ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/