नाही कधी संपायची हृदयातली माझ्या गझल
सत्यात आता उतरली स्वप्नातली माझ्या गझल
सांगावया ऐकावया गुज अंतरीचे दिव्य हे
येते पुन्हा धावून ही श्वासातली माझ्या गझल
नाही तिला भय कोणते नाचावया अन गावया
साकारते शिवरूपता भासातली माझ्या गझल
पाण्यावरी हृदयातल्या गझला किती झंकारल्या
आता पुरे झाले म्हणे ओठातली माझ्या गझल
आली पुन्हा दीपावली काव्ये नवी साकारली
आत्म्यातला लावे दिवा नयनातली माझ्या गझल
वृत्त – मंदाकिनी, मात्रा २८
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा.