सोनार कुशल मी झाले दागिन्यात मढण्यासाठी
अन पाथरवटही झाले मूर्तीस घडविण्यासाठी
धगधगत्या ज्वालेमध्ये काहिली तनूची होता
मी रान जिवाचे केले पावसात भिजण्यासाठी
दगडाच्या भावामध्ये विकताना पाहुन रत्ने
मी रत्नपारखी झाले अंगठ्या बनविण्यासाठी
घामाने शिंपित गेले कागदी मळा काव्याचा
थंडीत बोचऱ्या फिरले घामास जिरविण्यासाठी
मज घाम पुसायालाही सवड ना मिळाली जेव्हा
ते निरखित मज बसलेले दोषांना टिपण्यासाठी
मी कधीच पर्वा मोहक कायेची केली नाही
पण मनास इतुके जपले भावना फुलविण्यासाठी
तो मदांध होता तेव्हा अन ती तर बुरखाधारी
त्यां मिळुदे सम्यकदृष्टी सुंदरता बघण्यासाठी
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा