गगनाला चुंबुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
सीतेला भेटुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
तंबोरा लावित होती पण मजला पाहुन हसली
तिजसंगे गाउन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
केशरी फुलांच्या बागा बागेत झुल्यावर हसऱ्या
रामाला पाहुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
मंदिरी देव नी देवी अन हवेलीतले वारे
त्या मरुता प्राशुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
जलदातुन शीतल सुरभित गंधोदक वर्षत होते
पावसात नाचुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
पाण्यात हंसिनी शुभ्रा हंसांचा मंजुळ कलरव
त्या जलात डुंबुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
निर्धूम अग्निच्या ज्वाला यज्ञात उमलल्या होत्या
मी दर्शन घेउन आले सोळाव्या स्वप्नामध्ये
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा