अंतरीच्या दीपज्योती पाहताना दर्पणी
चेहऱ्याला का जपू मी चेहरा तर दर्शनी
काय तुझिया आत आहे काय तव ओठांवरी
चार बोटे बांधुनीया नाचवीशी तर्जनी
प्रकृतीचे बोल जपण्या काल होते मौन मी
बोलण्याची आज संधी वाटते मज पर्वणी
भरजरी मन-अंबराचा गझलबाला काठ रे
मोरपंखी पदर त्याचा रमवितो तुज सर्जनी
अष्टद्रव्ये वाहुनी पाटावरी तू मोकळा
भावसुमने ठेव थोडी पूजनी अन अर्चनी
निर्मिकांना न्याय देण्या राज्य तू केले जरी
कर्मकांडे संपविण्या दंग होशी नर्तनी
लगावली – गालगागा गालगागा गालगागा गालगा