उचललास तू रदीफ माझा टाळलेस मम काफियांस का
जमीन अवघी सुंदर असुनी गाळलेस मम काफियांस का
राखेमधल्या ठिणग्यांमधुनी झळाळून ते उठतिल पुन्हा
ठाउक होते सत्य तुला पण जाळलेस मम काफियांस का
ऊन देउनी पाखडलेले पारखलेले निवडक असुनी
तुझ्या फाटक्या चाळणीतुनी चाळलेस मम काफियांस का
बिनकाटेरी तव कवितेला बाभुळकाटी कुंपण असता
राखण करण्या काव्यफुलांची पाळलेस मम काफियांस का
वृत्त राजसी वृत्ती सात्विक अवतीभवती गझला सुरभित
तरी ‘सुनेत्रा’ कुंतलात घन माळलेस मम काफियांस का
मात्रावृत्त ( ८+८+८+८=३२ मात्रा)