रंगत गेल्या पुन्हा मैफिली दूर जरी तू माझ्यापासुन
माथ्यावरती तुझी सावली दूर जरी तू माझ्यापासुन
रखरखणाऱ्या उन्हातसुद्धा छायेमध्ये तुझिया आई
भिजली पाने सर्व चाळली दूर जरी तू माझ्यापासुन
भेट न आता प्रत्यक्षातिल ठाउक आहे म्हणून मी तव
फोटोमधली छबी वाचली दूर जरी तू माझ्यापासुन
करुणामय दो नयनांमधुनी फक्त प्रेम अन प्रेमच बरसे
हाच दुवा अन दवा बाटली दूर जरी तू माझ्यापासुन
तीळगुळासम स्नेह वाटण्या कुंकुमवर्णी सांज व्हावया
तव हृदयीची ज्योत हासली दूर जरी तू माझ्यापासुन
मात्रावृत्त (८+८+८+८=३२ मात्रा)