संक्रांतीला लुटू अक्षरे चला सख्यांनो
शब्दफुलांचा फुलवू सुंदर मळा सख्यांनो
भेटण्यास या काव्य घेउनी मला सख्यांनो
गाउन त्यांना खुलवू अपुला गळा सख्यांनो
सुगंध भरण्या रंगबिरंगी मनात कोमल
कुसुम कळ्यांसम शिकू नवनव्या कला सख्यांनो
घटात भरुनी नीर मृत्तिका प्रेम पेरता
निसर्ग होइल मित्र खरोखर भला सख्यांनो
तीळ-गुळासह हळदीकुंकू पानसुपारी
देउन टळवा कपोलकल्पित बला सख्यांनो
जादूटोणा बलीप्रथेचा अंत कराया
भाकड भोंदू षंढ रुढींना छळा सख्यांनो
खरी संपदा शरीर बुद्धी तिला जपाया
प्रभात समयी चाला नाचा पळा सख्यांनो
दुजा न लिहितो भाग्य आपुले स्वतःच लिहुया
त्यासाठी पण पुसा स्वच्छ मन फळा सख्यांनो
झोपडीत मम येण्यासाठी झऱ्याकाठच्या
कुंजवनाच्या वळणावरती वळा सख्यांनो
मात्रावृत्त (८+८+८=२४ मात्रा)