मी उभी कमळात सुंदर ओंजळी भरभरुन देण्या
वाहणारी नीर धारा घागरी भरभरुन देण्या
अंगणी धनधान्य सांडे अंबरातिल चांदण्यांसम
हात दोन्ही सज्ज माझे पोतडी भरभरुन देण्या
रेखिते मी काव्यचित्रे कृष्णवर्णी मौक्तिकांनी
भावभरली शब्दसुमने टोकरी भरभरुन देण्या
मी वडाचे बीज इवले भूवरी उगवून येते
बहरते मी पसरते मी सावली भरभरुन देण्या
अचुक तोले मी ‘सुनेत्रा’ खास असुनी आम आहे
खूप भारी मम तराजू तागडी भरभरुन देण्या
अक्षरगणवृत्त, मात्रा – २८
लगावली – गालगागा/ गालगागा/ गालगागा/ गालगागा/