शब्दांना भोगले तरीही शब्दांना जागले
विषयांनी ग्रासले तरीही विषयांना जागले
वस्त्र बदलले देश बदलले भोगांसाठी नव्या
भोगांनी गाडली सुखे पण भोगांना जागले
स्तुति सुमनांना भुलून जाता तनू पुलकित झाली
गंधांनी भाजून निघाले गंधांना जागले
अनुरागातच रमले झुरले नजरकैद जाहली
रागांनी कोंडले मला पण रागांना जागले
रुपांतर रंगांतर केले मूळ स्वभाव तसाच
अनेक धर्मी स्वभाव जपण्या धर्मांना जागले
मात्रावृत्त (१६+११=२७मात्रा)