नजरेमध्ये प्रेम असूदे विषय कशाला
वयात अन्तर अंतरात मग प्रणय कशाला
भाव भावना भरून वाहे कुठे वास ना
वसन लपेटू दहा दिशांचे प्रलय कशाला
स्वभाव अपुला जपेल ‘मी’ रे नको काळजी
कधी उसळ अन उर्मट हो तू विनय कशाला
मला न भीती अपघाताची अन मरणाची
मीच यमाई तुझ्याकडुन मज अभय कशाला
अचूक समयी समई विझते देवघरातिल
सरणावरती समय मागतो समय कशाला
मरू कशी गझलेला सोडून सांग जीवना
तिच्याविना जगण्याची व्हावी सवय कशाला
वलयांकित मी काव्यांकित मी प्रसिद्ध सुद्धा
तुझिया भवती हवे ‘सुनेत्रा’ वलय कशाला
मात्रावृत्त (१६+८=२४ मात्रा)