ज्येष्ठामधल्या सायंकाळी शुभ्र अचानक सर येते
ढगामधुनी उन्हात फिरण्या पश्चिम क्षितिजावर येते
सप्तरंगमय इंद्रधनुष्या निळ्या पटावर रेखाया
सात स्वरांच्या छेडित तारा नाचत अंगणभर येते
श्याम श्वेत कापूस घनातिल पिंजत उधळत सर वेडी
गळ्यात घालुन गळा सरींच्या करात घेउन कर येते
पिंपळ पानांची सळसळ अन उंबर तळीचा पाचोळा
ऐकाया वेचाया वाकुन होऊन धरणी धर येते
सखी सुनेत्रा पाऊस धार ठेवुन म्यानात तलवार
प्रत्यंचा ताणून धनूची बनून मोती शर येते
मात्रावृत्त (१६+१४ =३० मात्रा)