कोषातल्या कळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी
मौनातल्या गळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी
गळतात छप्परे भिंतीस पोपडे पण सुविचार मांडणाऱ्या
शाळेतल्या फळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी
घेऊन कागदांचे गलबत जहाज होड्या येतात बालके मग
ओढे झरे तळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी
भेगाळल्या धरेला मातीस तापलेल्या शिम्पावया फुलांनी
बागा वने मळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी
घुमतात पावशे अन हसती गुलाब गाली गालावरील त्यांच्या
वेड्या निळ्या खळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी
अक्षरगण वृत्त – मात्रा ३६
लगावली – गागालगा/लगागा/ गागालगा/लगागा/ गागालगा/लगागा/