देऊन टाकले मी सामान राहिलेले
माझे मला पुरे हे ताबाण राहिलेले
मी बोलले तुला जे होते जरी पुरेसे
उरलेत कागदी हे वाग्बाण राहिलेले
मज वेड गझल लावी अन भावनेत भिजवी
भरते अता सुखाने ते पान राहिलेले
माझ्यासवे रहा रे मम वेग पाहण्या तू
धुंदीत काम करण्या बेभान राहिलेले
जिन मंदिरी पहाटे निर्वाण कांड पाहू
करण्यास ये जिनांचे गुणगान राहिलेले
तू शरण जा प्रभूला आता अनन्य भावे
ओतून भावपुष्पे दे वाण राहिलेले
ही गझल पूर्ण झाली म्हण तू तिला सुनेत्रा
देईल ती तुला तव सन्मान राहिलेले
अक्षर गण वृत्त – मात्रा – २४
लगावली- गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/