नको करू तू नको फारसा विचार माझा
नको दाखवूस कोठे बसला प्रहार माझा
थकले आता प्रहार करुनी विचार करुनी
नको वाटते कुणी करावा पुकार माझा
मला वाटते सर्व सोडुनी जावे का मी
कुठे जायचे जिथे तिथे बघ तिहार माझा
जीव गुंतला फुलांमधे या कसा सोडवू
कसा द्यायचा गोड फुलांना नकार माझा
पुणे सांगली साताऱ्याला जाणे नाही
कसा पहावा तुझा लाडला बिहार माझा
घरात बसुनी दमते इतुकी कोठे जाऊ
कुठे जायचा अजून नाही विचार माझा
वळणावरती नित्य थांबते चाहूल घेते
वळणावरती मला भेटतो उकार माझा
उकार नेतो वरती वरती वेगे वेगे
संयम शिकवी तेव्हा मजला अकार माझा
कशास जाऊ तीर्थ वंदना करावयाला
माणसात मज नित्य भेटतो मकार माझा
माझ्या हृदयी तीन्ही रत्ने झळक झळकती
दिवाळीतल्या दिव्यात पाहिन अकार माझा
रंगून जाइन तुम्हा रंगविन प्रेमामध्ये
गझलेमध्ये भरेल गोडी खुमार माझा
अंतरंग अन बहिरंगीही कषाय विरहित
नग्न गुरूला असे नमोस्तू त्रिवार माझा
सुकी लाकडे शेणकुटावर तूप ओतुनी
भट्टीमध्ये खरा फुलावा निखार माझा
प्रभातीस मी गाणे गावे तुला भजावे
दर्शन घेता जळून जावा विखार माझा
नजर कोठडी भगवंताची प्रिय प्रिय वाटे
उधळुन देण्या दहा दिशांना धुमार माझा
माझी दृष्टी आत पाहते तुला पाहण्या
मी का पाहू कोठे बसला प्रहार माझा
तुझ्या फुलझड्या माझ्या टिकल्या दिसतिल उडतिल
जरी वाटला भाव सुनेत्रा सुमार माझा
मात्रावृत्त- २४ मात्रा