आलिंगन हे दोन फुलांचे की चुंबन आहे
नको नकोचा मस्त बहाणा की लंघन आहे
गोष्ट जुनी ती आठवलीका नवी सदा वाटे
गोष्टीमध्ये सारवलेले बघ अंगण आहे
प्राजक्ताचा परिमल लहरे वाऱ्याशी खेळे
सुमने वेचित किणकिणणारे तव कंकण आहे
रांगोळीचे जोडुन ठिपके चित्र एक रेखू
घर कौलारू सताड उघडे फुल-कुंपण आहे
परसामध्ये गाय हम्बरे हुंदडते वासरू
मुक्त घ्यावया श्वास भरोनी ना बंधन आहे
भ्रमरांचा गुंजारव चाले कुसुमांच्या भवती
प्रेमालापासाठी मंजुळ हे गुंजन आहे
मक्त्यामध्ये नाव सुनेत्रा हसता पडे खळी
खळीत वाटे दरवळणारे मन चंदन आहे
गझल मात्रावृत्त – मात्रा २६