गगन भरारी घेण्यासाठी सज्ज पाखरू पुन्हा जाहले
धावायाला कुरणावरती सज्ज कोकरू पुन्हा जाहले
गाय चाटता वात्सल्याने वाघाच्या बछड्यास सानुल्या
क्षीर प्यायला वाघीणीचे सज्ज वासरू पुन्हा जाहले
मौन जरी मी तुम्हास वाटे मंजुळ छुमछुम वाजायाला
पैंजणातले अस्सल नाजुक सज्ज घुंगरू पुन्हा जाहले
कर्मनिर्जरा होण्यासाठी अंगागाला बोचायाला
बाभुळकाटे कुसळ सराटे सज्ज गोखरू पुन्हा जाहले
मेंढपाळ मी गौर ‘सुनेत्रा’ कधी न भुलते कोल्हेकुईस
म्हणून माझ्यासंगे चरण्या सज्ज मेंढरू पुन्हा जाहले
गझल मात्रावृत्त – ३२ मात्रा