अस्त्र माझे भेदणारे ढाल आहे
उजळलेले लेखणीचे भाल आहे
कागदावर नाचताना लेखणीही
प्रीत माझी गात देते ताल आहे
हे नव्हे रे केस माझे कृष्ण कुरळे
ही निशेला तू दिलेली शाल आहे
हे नव्हे रे ओठ माझे रंगलेले
हा गुलाबाचा गुलाबी गाल आहे
हाच रे कागद तुझा तो हरवलेला
हळद ओली स्वाक्षरी बघ लाल आहे
तू नको मोजूस मात्रा नाच संगे
ठुमकणाऱ्या गझलची ही चाल आहे
हासणे निर्व्याज्य लोभस षोडशीचे
मूढ तिजला म्हणुन म्हणती बाल आहे
काफियांच्या रत्नराशी ओतते मी
नेणिवेतील हा तळीचा माल आहे
अजुनही प्रेमात पडशी रंग बघुनी
सावळी गौरी न तो भूपाल आहे
आम्रफल तुज अर्पिते मी आज देवा
कांचनी हे कवच त्याचे साल आहे
वाळलेली रापलेली ताप करोनी
जाहली उज्वल सुनेत्रा काल आहे
गझल – मात्रा २१
लगावली – गालगागा/४ वेळा