बाहेर तू उन्हाने होशील तप्त भारी
डोक्यातल्या भुश्याची पेटेल आग सारी
या शायरीत माझ्या आहेच जल सुगंधी
ते शिंपडून पाणी विझवेल आग झारी
क्षितिजावरून वाहे झुळझूळ शीत वारा
त्याच्यासवे ढगांची आता निघेल वारी
नाही कसे म्हणावे वळीवास त्या धरेने
होती अधीर तीही चाखावया खुमारी
घेऊन मौन ओठी तू ऐक गझल माझी
आता हसावयाची अमुची असेल बारी
गझल – मात्रा २४
लगावली – गागालगा/लगागा/ गागालगा/लगागा/