दाटता आभाळ काळे नाच नाचे शर्वरी
घालुनी पायात वाळे नाच नाचे शर्वरी
बोलणे टाळे अताशा व्यर्थ काथ्याकूट तो
लावुनी ओठांस टाळे नाच नाचे शर्वरी
उमटता सौदामिनीची सागरावर अक्षरे
सागरी लाटांस चाळे नाच नाचे शर्वरी
गडगडाटी युद्ध होता सावळ्या जलदांतले
सोदण्याने नीर गाळे नाच नाचे शर्वरी
तीन दगडांच्या चुलीवर पात्र भरले ठेवुनी
वाळल्या काष्ठांस जाळे नाच नाचे शर्वरी
गझल – अक्षरगणवृत्त (मात्रा २६)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा/