दशधर्माची शिडी चढोनी दहा पावले मोक्षासाठी
उचल उचल माणसास प्राण्या उचल बाहुले मोक्षासाठी
कथापुतळ्यांसम जीवन जगणे मम जीवाला ना मानवते
चक्रव्युहासम क्लिष्ट सापळे कुणी बनविले मोक्षासाठी
कुणी कुणाला पावत नसते फक्त पावती कर्मे अपुली
देच पावती अथवा कागद जे जे जळले मोक्षासाठी
तेलवात जळण्यासाठीही पात्र लागते हवा लागते
मी देहाचे पात्र ताणले पण उजळवले मोक्षासाठी
मोक्षाचा मज अर्थ कळाला मरणामधुनी जगण्यामधुनी
स्वधर्मास मी साक्ष ठेवले रडले हसले मोक्षासाठी
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)