बरसत्या धारांमधूनी नाद ऐकू येत आहे शांतरसमय
सागरी लाटांमधूनी गाज ऐकत वात वाहे शांतरसमय
चालली वारी पुढे ही रंगल्या भक्तांसवे या पंढरीला
सोहळा भिजल्या मनांचा सावळा आषाढ पाहे शांतरसमय
भावघन श्रद्धा म्हणोनी शब्दधन मी मुक्त सांडे लेखणीतुन
बाग मग सारस्वतांची माझिया काव्यात नाहे शांतरसमय
बांधुनी तालासुरांनी अक्षरे लय साधणारी गीत बनता
बंदिशीतिल राग माझ्या अंतरी वस्तीस राहे शांतरसमय
प्राशुनी मी चांदणे शरदातले रंगून वीणा वाजवीते
मौन मी पौषात शिशिरी तृप्त मी चैत्रात माहे शांतरसमय
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा ३५)
लगावली – गालगागा/ ५ वेळा